कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गास केंद्राने मान्यता दिली आहे. हे काम निश्चितपणे पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मध्य रेल्वेच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे उभारलेल्या नवीन विश्राम कक्षाचे आणि राजारामपूरी दिशेने दुसऱ्या प्रवेशासह सर्व फलाटांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींग सुविधेसह कार्गो हब विकसित करू - सुरेश प्रभू यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महापौर सरिता मोरे आदी उपस्थित होते. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यात व्यापारवृद्धी वाढेल, तसेच शेती उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध होतील, निर्यातीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गाबरोबरच कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग निश्चितपणे पूर्णत्वाकडे नेऊ, तसेच पश्चिम महाराष्ट्र हा एक देशातील सर्वांगीण विकसित झालेला भाग असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सामान्य माणसाच्या हितासाठी रेल्वेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्र शासनाने प्रधान्य दिले असल्याचे सांगून प्रभू म्हणाले, गेल्या चार वर्षापूवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासनाने रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामधील योजना आता प्रत्यक्षात पूर्ण होऊ लागल्या आहेत. देशात रेल्वे ट्रॅकच्या नुतनीकरणाचे मोठे काम झाल्याने अपघाताचे प्रमाण शुन्यावर आले आहे. यापुढेही रेल्वे अधिक लोकाभिमुख बनविली जाईल, असेही ते म्हणाले.