सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांना स्पर्श करून लुप्त, भाविकांची गर्दी
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या किरणोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली आहे. किरणोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या मावळत्या सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या चरणांना हलकासा स्पर्श करत लुप्त झाली. आज सायंकाळी ६ वाजून तेरा मिनिटांनी अंबाबाईच्या गाभार्यातील मूळ मूर्तीला हा चरण स्पर्श झाला.
नोव्हेंबर महिन्यात किरणोत्सवात अडथळे निर्माण झाले होते. ते अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे गुरूवारी पहिल्याच दिवशी सूर्याची किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचली होती. परंतु, आज ढगाळ वातावरण असल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला नाही.
प्रत्येक वर्षातील नोव्हेंबर आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात असे दोन वेळा अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे, भाविकांची गैरसोय होऊ नये आणि किरणोत्सव पाहता यावा यासाठी यावर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे दोन ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या किरणोत्सवानंतर अंबाबाईची आरती करण्यात आली.