कौतुकास्पद! चहावाल्याचा मुलगा झाला राष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू
भंडारा - तुमसर शहरातील चहा विक्रेत्याच्या मुलाने विदर्भातील पहिला राष्ट्रीय जिम्नास्ट होण्याचा मान मिळविला आहे. हिमांशू विजयकुमार गभने हा २० वर्षीय तरुणाच्या कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याच्या कामगिरीमुळे तो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
हेही वाचा - रणजी चषक विजेत्या विदर्भ संघाला बीसीसीआय, व्हीसीएकडून बक्षीस जाहीर हिमांशूने राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. मात्र, त्याचा प्रवास खूप कठीण होता. खेळात मोठे बनविण्याचे स्वप्न डोळ्यापुढे ठेवून त्याचे वडिल त्याला ४ वर्षांचा असल्यापासूनच सकाळी ४ वाजताच मैदानावर त्याच्याकडून सराव करून घेत. सरावानंतर दिवसभर चहाचे दुकान सांभाळायचे. हिमांशूने खेळ, शाळा आणि उरलेल्या वेळेत दुकान, असा दिनक्रम बनविला आहे.
हेही वाचा - COPA DEL REY: रोमांचक सामन्यात रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाची बरोबरी जिम्नास्ट बनविण्यासाठी सुदृढ शरिरयष्टी आणि त्यासाठी योग्य आहाराची गरज असते. मात्र, हिमांशूचे वडील चहा विकतात. यामुळे घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मात्र, तरीही त्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता हिमांशूला सुरुवातीपासूनच खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. या प्रोत्साहनामुळेच हिमांशू राष्ट्रीय स्तरावरील जिम्नास्ट झाला.
हिमांशू २०१० पासून शिव छत्रपती स्पोर्टस अॅकॅडमी, पुणे येथे प्रशिक्षण घेत आहे. २०१३ साली सांगली येथे आयोजित ट्रॅपोलिन जिम्नॅस्टिक ज्युनिअर नॅशनल स्पर्धेमध्ये वैयक्तिक स्तरावर हिमांशूने रौप्यपदक मिळविले आहे. शालेय स्तरावर हैदराबाद येथे २०१६ साली झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट संघासाठी त्याने कांस्यपदक मिळविले आहे. गुजरात येथे २०१७ साली झालेल्या सिनियर आर्टिस्टिक खेळात त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
हेही वाचा - विदर्भ संघाचे आजचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय दर्जाचे - प्रशिक्षक चंद्रकांत पंडित महाराष्ट्रातील एकूण १४ जिम्नॅस्टिक खेळाडूंपैकी हिमांशू विदर्भातील एकमेव खेळाडू आहे. यामध्ये ७ मुली व ७ मुले, असा गट आहे. आधुनिक जिम्नॅस्टिक खेळ हा आर्टिस्टिक, रिदमिक आणि ट्रॅपोलिन या तीन प्रकारांमध्ये विभागला जातो. हिमांशू हा आर्टिस्टिकच्या रिंग्ज, व्हॉल्ट, फ्लोअर, पॅरालल आणि ट्रॅपोलिनमध्ये निपून आहे. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर ३६ राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची हिमांशूने जिद्द बाळगली आहे. हिमांशूने यशाचे श्रेय आई-वडील आणि प्रशिक्षकांना दिले आहे.