मिरवणूक काढून भंडारा पोलिसांचा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीचा आगळावेगळा निरोप
भंडारा - येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागातील पोलीस कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीचा आगळावेगळा निरोप दिला. या निरोप समारंभादरम्यान सेवानिवृत्त लक्ष्मण हुकरे या पोलीस हवालदाराची गाडीतून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
लक्ष्मण हुकरे हे मागील १० वर्षापासून भंडारा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कामाचा काल (३१ जानेवारी)ला शेवटचा दिवस होता. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलीस स्टेशनमध्येच निरोप समारंभ होईल, असे त्यांना वाटले होते. मात्र, पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी हुकरे यांचा नोकरीचा शेवटचा दिवस अविस्मरणीय व्हावा, यासाठी त्यांची गाडीतून मिरवणूक काढली. वाचा-अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता सुरुवातीला ऑफिसमध्ये निरोप समारंभ पार पडला. शाल, श्रीफळ देऊन हुकरेंचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. त्यानंतर भंडारा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात खुल्या गाडीतून हुकरे दांपत्याची मिरवणूक काढली. मिरवणूक पोलीस ठाण्यापासून गांधी चौकापर्यंत आणण्यात आली. त्यानंतर लक्ष्मण हुकरे यांना पोलीस निरीक्षकांच्या गाडीतून घरी सोडण्यात आले. या गौरवाने लक्ष्मण हुकरे यांच्यासह सर्व कर्मचारी भावुक झाले होते. वाचा- माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना अखेरचा निरोप अशाप्रकारचा आगळावेगळा निरोप समारंभ शहरवासीयांसाठीही अनोखा होता. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्याला दिलेला हा निरोप सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. लक्ष्मण हुकरे हे १५ फेब्रुवारी १९८९ मध्ये भंडारा पोलीस विभागांमध्ये भरती झाले होते. मागील ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी भंडारा, लाखनी, पालांदूर हायवे या ठिकाणी सेवा बजावली आहे. मागील १० वर्षांपासून ते भंडारा पोलीस स्टेशनमध्ये काम करीत होते. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांचे आवडते होते.