आर्थिक व्यवहारातून मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची नियुक्ती ; विद्यार्थ्यांचा आरोप
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठात कुलसचिवपदी निवड झाली आहे. मात्र, या नियुक्तीमागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना कृती समितीने केला आहे. याबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या भूमिकेने पेपर तपासणीचे काम... संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख हे कारंजा येथे प्राचार्य असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी गाजली होती. ए.पी.आय स्कोर पूर्ण नसताना देशमुख हे गैरमार्गाने प्राचार्य पदावर नियुक्त झाले होते. तसेच अन्य गंभीर प्रकरणातही त्यांची चौकशी सुरू आहे, असे पत्र स्वतः कुलगुरू डॉ. मुरलीधार चांदेकर यांनी दिले आहे, असे असताना कुलगुरूंनी नेमक्या कोणाच्या दबावात देशमुख यांना अमरावती विद्यापीठातून कार्यमुक्त केले, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कुलगुरूंनी देशमुख यांना कार्यमुक्त करताना राज्यपालांची परवानगी घेतली का? तसेच देशमुख यांची विविध प्रकरणात चौकशी सुरू आहे, याची माहिती मुंबई विद्यापीठाला दिली का? असा सवाल विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात विचारण्यात आला आहे. विद्यापीठातील देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच एका राजकीय व्यक्तीकडून त्यांची थेट मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यासाठी लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार केला आहे. या प्रकरणाची कुलसचिवांनी चौकशी करावी. या गंभीर प्रकणाची कुलगुरूंनी दखल घेतली नाही तर सर्व पक्षीय विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी दिला.
हेही वाचा - रुसामुळे महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांना संशोधनाची संधी - विनोद... कुलगुरूंना निवेदन सादर करताना राहुल माटोडे यांच्यासह युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव समीर जवंजाळ, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख राम पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर प्रमुख आकाश हिवसे उपस्थित होते.