पठावे दिगर येथे विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक - बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथे विवाहित प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवाहित बाळू मधुकर टोपले (वय ३०) आणि विवाहिता आशाबाई पोपट चौरे (वय २९) यांनी झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली.
बाळू टोपले हा सोग्रस तालुक्यातील चांदवड येथे पोल्ट्रीफार्मवर सपत्नीक कामाला होता. तर याच शेडवर आलीयाबाद येथील आशाबाई चौरे आणि पोपट चौरे हे दांपत्य कामास होते. याचदरम्यान आशाबाई आणि बाळू यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी आशाबाई आणि तिचा पती पठावे गावी आले होते. येथे आल्यापासूनच आशाबाई बेपत्ता असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हे दोघेही पठावे दिगर येथील सावरपाडा शिवारातील आंब्याच्या झाडाला आज सकाळी एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सटाणा पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.