नवापूर तालुक्यातील जंगली प्राण्याद्वारे ५ बकऱ्या फस्त
नंदुरबार - नवापूर तालुक्यातील कडवान शिवारात मधुकर पोशा वळवी आणि रुंदाबाई वळवी यांच्या शेतात ५ बकऱ्या जंगली प्राण्यांद्वारे फस्त करण्यात आल्या. यात ३ नर आणि २ मादींचा समावेश आहे. त्यामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात महिन्याभरापासून जंगली प्राण्यांद्वारे माणसांवर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. मधुकर वळवीची स्वतःची शेती नसल्यामुळे दुसऱ्याची शेती भाडे पद्धतीने घेऊन ते शेती करतात. रुंदाबाई यांना बचत गटमार्फत या बकऱ्या मिळाल्या होत्या. या बकऱया त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन होत्या. रात्री हल्ला झाला तेव्हा रुंदाबाई घटनास्थळी होत्या. परंतु, प्राण्याला घाबरुन त्या पळून गेल्या. त्यांनी सकाळी या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याला दिली. हेही वाचा - स्कुल बसने चिरडल्याने ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू पोलिसांनी वन विभागाला पाचारण केले. त्यानंतर नंदुरबार वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबाराचे वनपाल एम. जे. मंडलिक, वनरक्षक कविता गावित यांनी घटनास्थळाची पाहणी केली. विसरवाडी क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीकांत नागरे आणि गावाचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पंचानामा करुन वन्यप्राण्यांद्वारे हा हल्ला असल्याचे घोषीत करुन पुढील कारवाई करण्यात आली. सबंधित कुटुंबाला वनविभागातर्फे नुकसानभरपाई दिली जाणार, असे खांडबारा क्षेत्राचे वनपाल एम. जे. मंडलिक यांनी सांगितले.