• A
  • A
  • A
सिकंदर परत गेला; तुम्ही कुठून आलात, महाजनांचा पवारांना टोला

जळगाव - सिकंदर जग पादाक्रांत करत हिंदुस्थानच्या सीमेवर आला, त्याला येथून परत जावे लागले. सिकंदर परत गेला तर तुम्ही कुठून आलात, असा सवाल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांना विचारला आहे. भाजपला कुणीही चॅलेंज करू नये, केले तरी ते स्वीकारण्याची आमच्यात धमक असल्याचे ते म्हणाले. अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यात आता महाजनांनी नवीन भर टाकली आहे.


भाजपच्यावतीने शक्ती केंद्र प्रमुख संमेलन जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाजन बोलत होते. ते म्हणाले, मला आता इतक्या ठिकाणची आमंत्रणे येत आहेत. अजित दादा म्हणतात बारामतीत येऊन दाखवा. आमच्या मित्र पक्षाचे आमदार किशोर पाटील म्हणतात पाचोऱ्याला येऊन दाखवा. आता एकटा माणूस कुठे कुठे निवडणुका लढेल, असा मिश्कील प्रश्नही महाजनांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर आम्ही बारामती नगरपालिकाही जिंकू शकतो, असे महाजन म्हणाले होते. यावर अजित पवारांनी बारामतीत येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. याला प्रत्यूत्तर देताना महाजन बोलत होते.

भाजप सरकार असंवेदनशील सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या वक्तव्यालाही महाजनांनी प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले, आमच्याकडे मोर्चे येतायेत, आंदोलने होतायेत, हे खरे आहे. पण आमचे सरकार संवेदनक्षम आहे, म्हणून हे होतेय. समाजातील प्रत्येक घटकाला वाटते की आपला प्रश्न सुटेल म्हणून ते सरकारपर्यंत पोहचत आहेत. तुमचे सरकार होते तेव्हाही मोर्चे, आंदोलने होत होती. पण तुम्हाला ते दिसत नव्हते. कारण तुमचे सरकार खरेच असंवेदनशील होते, अशी टीका महाजन यांनी केली.

धनगर समाजालाही आरक्षण मिळणार

मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालादेखील लवकरच आरक्षण मिळेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, की निवडणुकीच्या आधी धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.

महागठबंधनची उडवली खिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारची घोडदौड सुरू आहे. म्हणूनच भाजप सरकारला रोखण्यासाठी सर्व विरोधक महागठबंधनच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. सायकल, कंदील, हत्ती, कुत्रं, मांजर, हात, अशा चिन्हांचे पक्ष भाजपला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा लोहपुरुष आहे. ज्याची छाती ५६ इंचांची आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा भाजपच सत्तेत येईल. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

शक्य तिथं गनिमी काव्याने लढाई
भाजपच्या विजयी घोडदौडी विषयी गिरीश महाजन म्हणाले, की आम्ही शक्य तिथे मैदानावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने लढतो. नाशिक, जळगाव आणि धुळ्यात आम्ही थेट मैदानावर लढलो. मात्र नगरमध्ये आम्ही कमी पडलो. म्हणून तेथे गनिमी काव्याने लढलो. ७० पैकी आमच्या फक्त १४ जागा आल्या, तरी मागे हटलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेसलासोबत घेऊन फायनल मॅच जिंकली, असेही महाजन यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES