• A
  • A
  • A
पडघम लोकसभा निवडणुकीचे : जळगावात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात, शह काटशहाला वेग

जळगाव - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अद्याप अवधी आहे. पण, जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला तिकीट दिले जाईल, याची चर्चा रंगू लागली आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आजची परिस्थिती लक्षात घेतली, तर आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांमध्ये शह - काटशहचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.


जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आता तरी आहे. मात्र, भाजप-सेनेत युती फिस्कटली, तर शिवसेना या मतदारसंघात उडी घेऊ शकते. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि सेना युतीच्या माध्यमातून एकत्र लढले होते. युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला होती. आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी भाजपच्या पदाधिकार्‍यांची इच्छा आहे. परंतु, भाजपकडून यापूर्वी झालेला दगाफटका लक्षात घेता शिवसेनेने स्वबळावरच लढावे, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे.
'हे' असतील संभाव्य उमेदवार
भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली तर जळगावात भाजपपुढे शिवसेनेचेच प्रमुख आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलताना भाजपला अंतर्गत गटबाजी उफाळून येणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार ए. टी. पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या नावांची चर्चा सुरू होती. परंतु, खासदार पाटील यांच्याविषयी जनतेत असंतोष असल्याचे कारण पुढे करत भाजपकडून या जागेसाठी ऐनवेळी विधानपरिषद आमदार स्मिता वाघ यांचा विचार होण्याची शक्यता आहे.

युती झाली नाही तर शिवसेनेकडून माजी आमदार आर. ओ. पाटील उमेदवार असतील. त्यांनी एक ते दीड वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात माजी मंत्री गुलाबराब पाटील यांना गळ घातली जात आहे. परंतु ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने देवकर यांच्यासह आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या नावांची चाचपणी केली आहे. माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे यांचेही नाव ऐनवेळी पुढे केले जाऊ शकते.

भाजपसमोर अंतर्गत गटबाजीचे आव्हान
भाजपविरोधातील जनतेच्या असंतोषाचा लाभ घेण्यास विरोधी पक्ष दुबळे पडणे, हीच आगामी निवडणुकीत भाजपची मुख्य जमेची बाजू असणार आहे. त्यातच उत्तम संघटन कौशल्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ आणि बूथ टू बूथ मार्किंग ही सारी तयारी आहेच. अशा स्थितीत जळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक मोठे आव्हान असेल ते अंतर्गत गटबाजीचेच. अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने पक्षांतर्गत गटबाजी वाढत आहे.

जिल्ह्यातील दोन विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाल्याने आतापासून परस्परांवर कुरघोडी करण्याचे राजकारण रंगत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. भाजप अंतर्गत सर्वेक्षणात खासदार रक्षा खडसे यांची कामगिरी असमाधानकारक असल्याची चर्चा कार्यकर्त्यांना मान्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जाणूनबुजून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांचे तिकीट कापण्याच्या तयारीत असल्याची भावना येथे आहे. खडसे - महाजन गटातील वादामुळे भाजपतर्फे येथून पुन्हा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळेंना संधी मिळण्याची पक्ष वर्तुळात चर्चा आहे. २०१४ च्या मोदी लाटेपूर्वी विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे या भागातून खासदार होते. त्यांची उमेदवारी ऐनवेळी कापून २०१४ मध्ये रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली गेली होती.
खडसेंना शह देण्यासाठी भाजपची खेळी
आता तर पक्षांर्गत गटबाजीमुळे खडसेंना शह देण्यासाठी भाजप - सेना युतीचे कारण पुढे करून रावेर लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची खेळी भाजपचे पक्षश्रेष्ठी खेळतील, अशी माहिती आहे. रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील किंवा भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यापैकी एका नावाचा विचार होऊ शकतो. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे अपक्ष उमेदवारी करू शकतात. रावेर मतदारसंघात तिकीट कापले गेले तर माजी मंत्री खडसे हे काँग्रेसच्या वाटेवर जाऊ शकतात. असे झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील जागेवरून वाद होऊ शकतात. खडसेंच्या माध्यमातून काँग्रेस या जागेवर दावा करू शकते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES