• A
  • A
  • A
पवार-विखे घमासान! राजकीय विरोधकांना शह देण्यासाठी विखेंना दिल्लीची गरज

अहमदनगर- राधाकृष्ण विखे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदासारखे कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असलेले पद आहे. तसेच जिल्हा परिषदही घरातच आहे. जिल्ह्यात आणि राज्यात माजी मंत्री थोरतांपेक्षा अधिकची ताकद, दबदबा आणि मोठा जनसंपर्क असताना विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी काँग्रेस नाही तर भाजपचे खासदार व्हायचे ही अगतिकता का आली? याबद्दल आता चर्चा होत आहे.


माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर बदलत्या परस्थितीत थेट हल्ला केला. पक्षाने विखे परिवाराला काय कमी केले? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राधाकृष्ण विखे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. काल पर्यंतची सुंदोपसुंदी आता थेट हल्ल्यावर आल्याने विखे-थोरात द्वंद्व जिल्हा आणि राज्याला पहावे लागणार आहे. वास्तविक राधाकृष्ण विखे यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नसताना आणि आजही ते विरोधीपक्ष नेते पदावर आणि पक्षातच असल्याचे स्पष्ट असताना थोरतांनी विखेंवर थेट हल्ला करत साधलेली संधी खूप काही सांगून जाणारी आहे.
वाचा - शरद पवार हुश्शार राजकारणी, 'यंदा जमणार नाही' त्यांना माहीत आहे - गडकरी
२०१९ चे विश्लेषकांचे अंदाज पाहता, राज्यात आघाडीला पुन्हा सत्तेत संधी आल्यास मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीमध्ये अशोक चव्हाण यांच्यानंतर विखे किंवा थोरात यांची नावे असणार आहेत. या परिस्थितीत राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात आयती चालून आलेली संधी साधण्याचे काम थोरात करत आहेत. विखे परिवार पक्ष निष्ठेच्या बाबतीत कसे अविश्वसनीय आहेत, हे ते आता उदाहरण देत पक्षासमोर अधोरेखित करत आहेत. दुसरीकडे विखे परिवार पण राजकारणात तरबेज असून विखे यांनी घेतलेली 'रिस्क' म्हणजे भविष्यातील मोठी चाल असल्याचे जाणकारांचे मत आहे.
वाचा - परभणी लोकसभेची लढत चौरंगी; वंचित आघाडीकडून आलमगीर खान यांच्या नावाची घोषणा
विखेंसह १० आमदार भाजपच्या वाटेवर-
विखे हे पदाचा राजीनामा देतील पण पक्षातच राहतील आणि भाजपसह काँग्रेस अशा दोन्ही डगरींवर हात ठेवतील आणि योग्य वेळ येताच कुणाचा हात धरायचा हे ठरवतील, असे बोलले जात आहे. २०१४ ला विखेंसह १० आमदार भाजपच्या वाटेवर, अशा बातम्या कोणी जाणीवपूर्वक पेरल्या आणि त्यानंतर इतर अनेक नावे चर्चेत असताना विखे यांना मिळालेले विरोधीपक्ष नेते पद बऱ्याच गोष्टी सांगून जातात. दबावाचे राजकारण करत साध्य साधून घेण्याची कला यावर त्यांचे विरोधकही दाद देतात. मात्र यातूनच ते आपली विश्वासहर्ता तर पणाला लावत नाही ना ? यावर आता बोलले जात आहे.
लोणीकरांनी खासदारकीसाठी राजकीय अस्तित्व का पणाला लावले ?

दिवंगत बाळासाहेब विखे यांनी तब्बल ३५ वर्षे खासदारकी केली. सात वेळा कोपरगाव आणि एकदा नगर (दक्षिण) असे एकूण आठ वेळेस ते निवडून आले. या दरम्यान काही काळ ते केंद्रीय अर्थराज्य मंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री राहिले. अनेक वर्षे दिल्लीत असल्याने साहजिकच केंद्रीय पातळीवर त्यांचे एक स्वतःचे वजन निर्माण झाले होते. ते त्यांनी आपल्या समर्थकांसाठी अनुकूल वापरताना राजकीय विरोधकांना धोबीपछाडन्यासाठीही वापरले. या धोबीपछाडीत त्यांनी आपल्या पक्षाला म्हणा वा पक्षांतर्गत विरोधकांनाही सोडले नाही. मात्र, काहीही असले तरी त्यांनी सर्वच तत्कालीन पंतप्रधान-राष्ट्रपती यांच्याशी जवळकीचे संबंध ठेवले. यातूनच त्यांनी इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रतिभाताई पाटील, अब्दुल कलाम असे अनेक राष्ट्रीय नेतृत्व प्रवरा-लोणीच्या भूमीत आणले. बंडखोर वृत्ती असली तरी संघटन आणि त्यातून विकास या हातोटी मुळे त्यांचा गुणगौरव सर्वांनी केला. मात्र, त्यांच्या हक्काचा कोपरगाव (आता शिर्डी) हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने आणि त्यानंतर २०१६ साली त्यांच्या निधनाने विखे परिवाराची असलेली दिल्ली नाळ काहीशी कमजोर झाली.

विखे परिवारासाठी पवार आणि थोरात राजकीय विरोधक
एकीकडे ही नाळ कमजोर होत असताना विखे परिवाराचे जिल्ह्यातील राजकीय पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात गटाने आपली दिल्लीतील जागा घट्ट केली. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीचे थोरात हे सदस्य आहेत. गुजरात निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक पक्षाने केले. थोरातांचे भाचे सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांचीही जास्त उठबस दिल्लीत असून पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या संपर्कात राहून थोरात यांनी आपले दिल्लीतील वजन हळूहळू वाढवलेले आहे. थोरात हे तसे शरद पवार यांना मानणारे. स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या पाठीशी शरद पवार यांनी नेहमीच ताकद दिली. तर विखेंना शंकरराव चव्हाणांनी ताकद दिली. त्यामुळे विखे परिवारासाठी पवार आणि थोरात हे मोठे राजकीय विरोधक राहिले आहेत.

बाळासाहेब विखे यांच्या निधनानंतर दिल्लीत निर्माण झालेली पोकळी भरून आपले पक्षांतर्गत स्थान भरभक्कम ठेवण्यासाठी विखे परिवाराला दिल्लीत आपला घरातील सदस्य अत्यावश्यक असू शकतो. त्या अनुषंगानेच सुजय यांना लोकसभेसाठी पक्षाकडून उतरवण्याचे नियोजन गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू करण्यात आले होते. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने विखेंना नगर दक्षिणेतून उमेदवारी शिवाय पर्याय नव्हता. नेमका हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी सुजय यांनी ३ वर्षांपासून इथे काम करण्यास सुरुवात केली.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सातत्याने या ठिकाणी झालेल्या पराभवाचे कारण पुढे करून मतदारसंघाची अदलाबदल शक्य होईल असा ठोकताळा मांडला खरा पण मोठ्या पवार साहेबांनी शेवटपर्यंत हा मतदारसंघ सोडला नाही. उलट १९९१ च्या बाळासाहेब विखेंच्या पराभवाची आठवण करून देत विखे परिवाराची जुनी जखम ताजी केली. दिल्लीत असावे लागणारे वजन आणि पवारांनी दिलेला नकार याचा अंदाज बहुधा विखे परिवाराला अगोदरच होता किंवा ३ वर्षे काम करून निवडणुकीचा तयार केलेला चक्रव्यूह म्हणा, यातून यशस्वी होऊनच बाहेर पडायचे म्हणून सुजय विखे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश घेत आपण काहीही करून निवडणूक लढवणारच आणि ती ही जिंकणार हा निर्धार केला आहे.
वाचा- CSMT BRIDGE : प्रशासनाच्या'अनेक पायांच्या शर्यतीमुळेच' घडली दुर्घटना, शिवसेनेने फोडले खापर
निवडणूकपूर्वच ही निवडणूक सुजय विखेंच्या उमेदवारीवरून चर्चेत आली आहे. आता शरद पवार यांच्या स्व. विखेंवरील टिप्पणीमुळे राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट शब्दात पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत आघाडीचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आघाडीत काहीशी बिघाडीही होण्याची शक्यता आहे. एक प्रकारे या मतदारसंघात पवार आणि विखे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विखे मुलासाठी प्रचार करू शकणार नसले तरी प्रवरा-लोणी यंत्रणेला आपल्याला काय करायचे हे माहीत आहे. त्यासाठी जनसेवा फाऊंडेशन हे स्वतंत्र व्यासपीठ अगोदरच कार्यरत आहेच.

पवार-विखे यांच्या वाक् युद्धामुळे स्वतः शरद पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष प्रचाराच्या टप्यात मोठे घमासान या मतदारसंघात दिसणार आहे. राधाकृष्ण विखे प्रचार करणार नसतील तर आघाडीच्या वतीने थेट राहुल गांधीचीच सभा या मतदारसंघात आयोजित करण्याचा प्रयत्न असणार आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES