• A
  • A
  • A
पवारांच्या मनात 1991 ची सल अजूनही धगधगती.. पुन्हा एकदा गडाख-विखे सामन्याची शक्यता

अहमदनगर - दिवंगत बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या विरोधात सन 1991 ला लोकसभेच्या निवडणूक अपक्ष लढवत शरद पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकले होते. मात्र पवारांनीही आपली सर्व ताकत गडाखांच्या पाठीशी उभी करत बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. पराभव न पाहिलेल्या विखेंना हा मोठा राजकीय धक्का होता.

संपादित छायाचित्र


याच पराभवाची पहिली सल विखेंना टोचली आणि त्यांनी पवारांच्या भाषणातील मुद्यांचा आधार घेत गडाख आणि पवारांना न्यायालयात खेचले होते. त्यावेळी राज्यभर ही निवडणूक आणि न्यायालयातील प्रकरण गाजले होते. कुठे तरी विखेंनी न्यायालयाच्या माध्यमातून पवारांवर मोठे राजकीय संकट निर्माण करून जेरीस आणल्याचे बोलले जात होते. त्यामुळे 1991 च्या निवडणुकीपासून पवार- विखे सुरू झालेले राजकीय वैमनस्य हे राधाकृष्ण विखे आणि अजित पवार या दुसऱ्या पिढीतही अनेकदा दिसून आले.

आता पवार-विखे यांची तिसरी पिढी या लोकसभेच्या निमित्ताने राजकारकरणात येऊ पहात असताना मध्यंतरी रोहित पवार आणि सुजय विखेंच्या प्रवरा नगर येथील साखर कारखान्यात झालेल्या सौहार्दपूर्वक भेटीचे वृत्त आणि छायाचित्रे माध्यमात आल्यानंतर हा राजकीय वाद शमेल आणि एक नवी सुरुवात या दोन राजकीय घराण्यात पाहावयास मिळेल असे वाटत होते. मात्र वेळोवेळी राष्ट्रवादीकडून जागेवर दावा सांगितला गेला आणि आज पुण्यात खुद्द शरद पवार यांनी नगर दक्षिणेवर राष्ट्रवादीचा असलेला दावा ठासून सांगतानाच 1991 साली दिवंगत बाळासाहेब विखेंच्या केलेल्या पराभवाची आठवण माध्यम प्रतिनिधींना करून दिली. एव्हढेच नव्हे, तर त्यावेळी विखेंनी आपल्याला न्यायालयात खेचून अडचणीत आणल्याचेही आवर्जून सांगितले. 1991 ची पहिली सल ही तशी त्यावेळच्या पराभवाच्या निमित्ताने विखे यांना बसली होती. तशी ती न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून राजकीय अडचणीत आणल्याने पवार यांनाही बसली होती.

दरम्यानचा काळ हा दोन्ही परिवारात राजकीय संघर्ष या ना त्या निमित्ताने पाहावयास मिळाला. तरी 2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवानंतर 2019 ला देशात आणि राज्यात काँग्रेस आघाडी सत्तेत येण्यासाठी दिल्ली पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्यामुळे सुजय विखे यांना नगर दक्षिण ही जागा राष्ट्रवादी अर्थात पवार सोडतील अशी मोठी अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाचा दाखला देत आणि आपण गेल्या तीन वर्षांत या मतदारसंघात केलेल्या कामांचा हवाला देत या जागेवर दावा ठोकला. तरी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने विखेंच्या हाती हा मतदारसंघ पडू न देण्याचेच धोरण ठेवले. त्यामुळे अखेरच्या सत्रात एकीकडे सुजय यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतानाच वडील राधाकृष्ण विखे यांनी मुलाला त्याचा राजकीय निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत योग्य तो संदेश दिला आहे. त्यामुळे 2019 ची नगर दक्षिणेची निवडणुकीकडे एक प्रकारे 1991 च्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती म्हणून पाहताना ही निवडणूक राज्यातील एक मोठी लक्षवेधी अशीच ठरणार आहे..

प्रशांत गडाखांचे नाव आले चर्चेत..
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने नगर दक्षिणेवरचा हक्क न सोडता ही जागा आमच्याकडेच राहील असे ठासून सांगितले. तरी अद्याप पक्षाचा उमेदवार कोण हा संभ्रम कायम ठेवला आहे. पाच ते सहा जणांची नावे वेळोवेळी चर्चेत ठेवली असली, तरी नेमकी उमेदवारी कुणाला हे स्पष्ट झालेले नाही. चर्चेतील अनेकजण खरच निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत का, हा ही एक प्रश्न आहे. शरद पवारांनी सुजय विखेंच्या नावावर काट मारतानाच जाणीवपूर्वक या मतदारसंघातील पक्षाचा उमेदवार कोण हे गुलदस्त्यात ठेवल्याचे दिसते. तरीही अंतिम टप्यात अनुराधा नागवडे आणि अरुण जगताप यांची नावे चर्चेत आल्यानंतर आता ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांचेही नाव चर्चेत आले आहे.

गडाख हे सध्या पक्षात नसले तरी पवारांसाठी गडाख हे जवळचे आणि हुकुमी कार्ड आहे. त्यामुळे प्राप्त परस्थितीत सुजय विखे हे निवडणूक लढवण्याबरोबरच जिंकण्यासाठी इरेला पेटलेले असताना पवार यांच्याकडूनही प्रशांत गडाख यांच्या रूपाने हुकुमाचा एक्का बाहेर निघण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास 1991 चा गडाख विरुद्ध विखे हा सामना पुन्हा एकदा पाहावयास मिळणार आहे. अर्थात येत्या काही तासांत बऱ्याच घडामोडी अपेक्षित असून याबाबतचे चित्र लवकरच समोर येणार आहे. मात्र जी ही लढत होईल, ती एक प्रकारे विखे विरुद्ध पवार अशीच चर्चेत असेल याबद्दल शंका नाही !!


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES