पुणतांब्यातील मुलींचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, ग्रामस्थांचा आरोप
अहमदनगर - पुणतांब्यातील आंदोलकर्त्या मुलींना रात्री उशीरा पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. यावरुन पुणतांब्यात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी बळजबरीने ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या ५ दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा या मुलींनी दिला आहे. मात्र, मध्यरात्री मुलींना रुग्णालयात दाखल करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शुभांगी जाधव या मुलीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला रात्री अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी तिच्यासोबत आंदोलन करत असलेल्या मुलींचीही रुग्णालयात रवानगी केली. मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी बळजबरीने कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्या मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी काही ग्रामस्थांनादेखील ताब्यात घेण्यात आले. यामुळे पुणतांब्यात मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंना जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केले. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. मात्र अद्याप तरी याबद्दल कोणताही तोडगा निघालेला नाही. शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज सकाळी मुलींची भेट घेण्यासाठी पुणतांबा येथे येणार होते. मात्र, मुलींना नगरला उपचारासाठी हलवल्याने खोतकर शिर्डिहून नगरला जाऊन मुलींची भेट घेणार आहेत.