ठाणे - १५ जानेवारीला ठाणे रेल्वे स्थानकात एक १७ वर्षीय मनोरुग्ण आणि तिच्यासोबत ३ ते ४ वर्षाची अज्ञात मुलगी आढळली. युपीतील हरवलेल्या या दोन बहिणी आता ठाणे शहर गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या मदतीने आपल्या घरी पोहोचल्या आहेत. ठाणे मनोरुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
१५ जानेवारीला रेल्वे स्थानकात आढळलेल्या या मुलींना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांच्यापुढे हजर केले होते. यावेळी तांबे यांनी या महिलेच्या उपचारासाठी मनोरुग्णालय ठाणे व अल्पवयीन मुलीस जननी आशिष संस्था डोंबिवली येथे सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले. तसेच या दोघींच्या पालकांचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी एक स्वतंत्र पोलीस शोध पथक तयार करून भोजपुरी भाषेचे ज्ञान अवगत असलेल्या एका महिलेस मदतीला घेतले. यासोबतच तांत्रिक साहाय्याने या मुलींची माहिती २५० व्हॉट्स अॅप ग्रुपवर पाठवली.
यादरम्यान ठाणे गुन्हे शाखेने उत्तरप्रदेश येथील दिलदारनगर पोलीस ठाण्याचे एसएचओ विमल मिश्रा यांच्याशी संपर्क साधत या हरविलेल्या मुलींचे वडील कमलेश राय यांचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क साधून दोन्ही मुलींची खात्री पटवली. या दोघीही १० जानेवारीला त्यांची आत्या पवित्रादेवी रा. तुलसी आश्रम रेल्वे स्टेशन उत्तरप्रदेश यांच्या गावी गेल्या होत्या. दोघी १२ जानेवारीला रेल्वेने घरी येण्यासाठी निघाल्या असताना त्या घरी न पोहोचता रेल्वेने थेट ठाणे येथे आल्याचे निष्पन्न झाले. ठाणे पोलीस आणि मनोरुग्णालयाच्या उपचारकांमुळे दोन्ही मुली सुखरूप आपल्या पालकांकडे पोहचल्याने न्यायाधीश तांबे यांनी पोलीस आणि मनोरुग्णालयाचे आभार मानले.