ठाणे - बदलापूरसह अनेक ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बदलापूर पश्चिम पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या २ वर्षापासून घरफोड्या करून लुटलेल्या लाखोंचे दागिने लपवण्यासाठी ही टोळी भूत बंगल्याचा आसरा घेत होती. अशाच दागिने चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला त्याच भूत बंगल्यातून काही मुद्देमालासह सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
मोबील सलीम शेख उर्फ बट्टा (२८), दिपक उर्फ खत्री जाधव (२८), हितेश सोलंकी (२८), चेतन वाघेरे (२४) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. या चौघांनी २ वर्षांत तब्बल ५० लाखांच्या जवळपास दागिन्यांची चोरी केली. अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांना त्यांच्याकडून ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. हेही वाचा -बदलापुरात २५ वर्षीय विवाहितेचे अपहरण करून निर्घृण हत्या गेल्या २ वर्षापासून बदलापूर पश्चिमसह अनेक परिसरात घरफोड्या व चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी बदलापूरमध्ये राहणारा आरोपी मोबील सलीम शेख उर्फ बट्टा याच्याविरूध्द चोरीचे गुन्हे दाखल होते. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत होते. मात्र, मोबील त्याचे अस्तित्व लपवत राहत होता. तो गणेशनगर परिसरातील एका पडीक असलेल्या भूत बंगल्यात असल्याची गुप्त माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे ए. एस. आय. जयराम भुसारे यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने भूत बंगल्याच्या ठिकाणी सापळा रचून चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी मोबीलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील ४ मोबाईल व काही सोन्याचे दागिने असा ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हेही वाचा -- राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कलाकाराचा आर्ट्स स्टुडिओ जमीनदोस्त, पालिकेची कारवाई मोबीलवर कर्जत पोलीस ठाण्यात १ व बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्यात ६ असे ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबील हा चोरी केल्यानंतर चोरीतील मुद्देमाल पडीक असलेल्या भूत बंगल्यात लपवून ठेवायचा. त्यानंतर चोरी केलेले सोन्याचे दागिने पश्चिम बंगाल येथे आपल्या पत्नीकडे लपवत असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत त्याने गेल्या २ वर्षात चोरी केलेल्या गुन्ह्यातील जवळपास ५० लाख हून अधिक रुपयाचे सोन्याचे दागिने पश्चिम बंगाल येथे लपून ठेवले असल्याची माहिती त्याच्याकडून पोलिसांना मिळाली आहे. ते दागिने लवकरच पश्चिम बंगाल येथे जाऊन हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.