• A
  • A
  • A
'स्टोन आर्ट्स'च्या माध्यमातून दगडांना बोलकी करणारी कलाकार

सिंधुदुर्ग - 'दगडांना बोलकी करणारी' कलाकार म्हणून कुडाळ-माणगाव येथील ॠतिका पालकरची ओळख आहे. तिच्या अनोख्या स्टोन आर्ट्स कलेमुळे तिला ही ओळख मिळाली आहे. निसर्गाने जे बनवले आहे, ते जसेच्या तसे वापरून विशिष्ट प्रकारे त्याची मांडणी करून आज कित्येक कलाकृती तिने बनवल्या आहेत.


घरातून अगदी लहानपणा पासून ऋतिकाला कलेचा वारसा लाभला आहे. वडिलांना काष्टशिल्प शोधताना मदत करताना तिला स्टोन आर्टचा छंद लागला. मुळातच वडिलांकडून कलेची नजर लाभलेली ऋतिका दगडांमध्ये वेगवेगळे आकार निरखू लागली. त्यामुळे काष्टशिल्प शोधण्यासाठी ती नदी- समुद्र किनारे तसेच जंगलांमध्ये नियमित फेरफटका मारत असे. वडील काष्टशिल्प घडवत असताना तिने नदी पात्रातील, समुद्र किनाऱ्यावरील दगडांना आपल्या कलाकृतींचे माध्यम निवडले.

या लहान मोठया, वेगवेगळ्या रंगांच्या दगडांमध्ये तिला अनेक आकृती खुणावू लागल्या. याच छंदातून बनवलेली तिची पहिली कलाकृती एका कलारसिक व्यक्तीने विकत घेतल्याने तिने या‌ कलेला व्यावसायिक स्वरुप देण्याचे ठरवले.

घरच्या लोकांचा पाठिंबा आणि निसर्गाकडून प्रेरणा घेत तिने विठ्ठल, गणपती, कृष्ण, कोकणी ग्रामीण जीवनावर आधारित व्यक्तीरेखा, अशा कलाकृतींची निर्मिती केली. अनेक लहान मोठ्या दगडापासून विशिष्ट रचनेतून शिवरायांची व्यक्तीरेखा,‌ मेंढपाळ, प्रेमी युगुल, पशू-पक्षी, फुले अशा अनेक कलाकृतींची निर्मिती तिने केली आहे.
ऋतिका आपली कलाकृती घडवताना दगडांना कोणताही आकार देत नाही किंवा रंग देत नाही. निसर्गाने जे बनवले‌ आहे, ते जसेच्या तसे वापरून विशिष्ट प्रकारे मांडणी करून त्यातून विविध कलाकृती लोकांसमोर मांडते. तिची प्रत्येक कलाकृती ही युनिक आहे. निसर्गही एक दगड जशास तसा पुन्हा बनवत नसेल. त्यामुळे ऋतिकाने बनवलेली एखादी कलाकृती जर तुमच्याजवळ असेल, तर तशीच दुसरी कलाकृती इतर कोणाकडेही असणार नाही. ऋतिकाची प्रत्येक कलाकृती वेगळी आहे आणि हेच तिच्या कलेचे वैशिष्ट्य आहे.
प्रत्येक कलाकारासाठी कौतुकाची थाप मिळणे हे त्याच्यासाठी प्रेरणादायी असते. ९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथील‌ 'ऑल इंडिया फाईन आर्ट अॅन्ड क्राफ्ट सोसायटी' या ख्यातनाम आर्ट गॅलरी मध्ये कलेचे प्रदर्शन मांडण्याची संधी ऋतिकाला मिळाली. दिल्ली येथील प्रदर्शनामध्ये ऋतिकाच्या नैसर्गिक दगडी कलाकृतींना खऱ्या अर्थाने योग्य न्याय मिळाला.
हेही वाचा-हळदी-कुंकूच्या माध्यमातून मदतीचा हात; कणकवलीत महिलांचा कौतुकास्पद उपक्रम
प्रदर्शन काळात 'स्टॅचू ऑफ युनिटी'चे निर्माते प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी तिच्या कलेचे कौतुक केले. राम सुतार यांची भेट आणि त्यांचे आशीर्वाद हे खुप मोठे भाग्य असल्याचे ऋतिका अभिमानाने सांगते. प्रदर्शनाचे उद्घाटक ख्यातनाम अर्थतज्ञ खासदार नरेंद्र जाधव यांनी ऋतिकाची 'आईने कडेवर घेतलेले मूल' या कलाकृती मध्ये आपल्याला त्या बाळाच्या चेहऱ्यावरील हावभावही दिसतात, अशा शब्दांत कौतुक केले.
आपण बनवलेली कलाकृती इतरांच्याही मनापर्यंत पोहचत आहे, हेच आपले खरे यश आहे. सरावानेच दगडातील आकार लक्षात येतात. वेगवेगळ्या थीम सुचत जातात. भविष्यामध्ये आपण आपल्या कलेच्या माध्यमातून कोकणातील निसर्ग व संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऋतिकाने सांगितले.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES