नाणार प्रकरणी सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल; पोलिसांचा चोख बंदोबस्त
रत्नागिरी - राजकीय विरोध झुगारून सुकथनकर समिती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली आहे. ही समिती मंगळवारी आणि बुधवारी प्रकल्पाशी संबंधित सर्व व्यक्ती आणि संस्थांचे म्हणणे ऐकून घेवून आपले अभिप्राय सादर करणार आहे.
नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा जोरदार विरोध आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, काढण्यात आले होते. त्यामुळे हा विसंवाद दूर करण्यासाठी द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची रचना करण्यात आली आहे. सुकथनकर यांच्यासह समितीमध्ये डॉ. श्रीरंग कद्रेकर (माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ), ज्येष्ठराज जोशी (ICT चे माजी संचालक) यांचा समावेश आहे. हा दौरा यशस्वी होवू देणार नाही, असा इशारा शिवसेना आमदार राजन साळवी यांनी दिला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप मिळाले आहे. ही समिती अल्पबचत सभागृहात प्रकल्पग्रस्त, मच्छिमार आणि संस्थांशी संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी समितीसोबत उपस्थित आहेत. चर्चा केल्यानंतर समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.