• A
  • A
  • A
ईव्हीएमच्या साथीने लंडनसह अमेरिकेतही 'कमळ' फुलेल, सेनेचा भाजपवर वार

मुंबई - थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले असल्याचे म्हणत, सेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे. ‘ईव्हीएम’ आणि फसफसणारा आत्मविश्वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलू शकेल असा खोचक टोलाही सेनेने लगावला आहे. 'याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर' या पद्धतीने कारभार सुरूच राहील असेही सेनेने म्हटले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रात यावेळी ४८ पैकी ४३ जागा जिंकू असा दावा केला आहे. तसेच पवारांच्या बारामतीत त्यांचा पाडाव करु असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर सेनेने चांगलाच निशाणा साधला आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू असल्याचे म्हणत भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे ४८ जागा हे लोक सहज जिंकू शकतात व देशात स्वबळावर ५४८ जागा कुठेच गेल्या नाहीत. ‘ईव्हीएम’ आणि असा हा फसफसणारा आत्मविश्वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही ‘कमळ’ फुलू शकेल. पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? असा प्रश्नही सेनेने भाजपला केला आहे. राज्यकर्त्या पक्षात जो संयम, विनम्र भाव असायला हवा तो अलीकडच्या काळात नष्ट झाला आहे. एक प्रकारची राजकीय बधिरता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष बेलगाम बोलतो हे मान्य, म्हणून सत्ताधारी पक्षानेही असे बेलगाम बोलू नये.

सत्ता कोणाला नको आहे. मात्र, २४ तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. ४८ पैकी ४३ जागा जिंकू या अहंकाराने महाराष्ट्राचे समाजमन गढूळ करत आहे. राज्यात काय कमी प्रश्न आहेत की, मुख्यमंत्री ते सोडून निवडणूक लढण्या-जिंकण्याचे जाळे विणत बसत असल्याचे म्हणत सेनेने मुख्यमंत्र्यांवर टिका केली. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे प्रकरण लटकलेल्या अवस्थेत आहे. पण ही स्थिती आम्ही निर्माण केली नसून २०१४ साली या पापाची बीजे भाजपने रोवली आहेत. सत्ता येते, सत्ता जाते. लाटा येतात, लाटा विरून जातात. लोकशाहीत अपघात होत असतात, पण लोकशाही व्यवस्थेत अपघातातून मार्ग काढण्याचे काम जनतेलाच करावे लागते. गेल्या ७० वर्षांत जनतेने हे कार्य नेटाने केले आहे.


महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. नगर जिल्ह्यातील पुणतांबे येथे शेतकर्‍यांच्या मुलींनी आंदोलन सुरू केले. ते आंदोलन चिरडण्यासाठी जे सरकार पोलीसी बळाचा वापर करते त्यांच्या तोंडी जिंकण्याची भाषा शोभत नाही. कांद्याला फक्त साडेसात पैसे भाव मिळत आहे. दुधावरील जीएसटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अनाथाश्रमांच्या दत्तक केंद्रांमध्ये गेल्या चार वर्षांत एक हजारावर बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शिक्षकांच्या २४ हजार जागा रिकाम्या आहेत. यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नसल्याचे सेनेने म्हटले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES