पवारांनी गडकरींची नव्हे राष्ट्रवादीचीच काळजी करावी - सुब्रमण्यम स्वामी
मुंबई - शरद पवारांनी गडकरींची काळजी करू नये, त्यांनी राष्ट्रवादीची काळजी करावी. त्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, अशी टिका सुब्रमण्यम स्वामींनी पवारांवर केली. भारत विकास परिषदेने आयोजित केलेल्या "आधुनिक भारताची परिकल्पना : भविष्यातील मार्ग" या विषयावर व्याख्यानासाठी ते मुंबईत आले होते. कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सध्या पंतप्रधानपदासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांनी गडकरींचे कौतुक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नितीन गडकरी विधिमंडळापासूनचे आपले सहकारी आहेत. पंतप्रधानपदासाठी आता त्यांचे नाव येत असल्याने मला त्यांची चिंता वाटते, असे वक्तव्य केले होते.
गडकरींनी अलिकडच्या काळात जाहीर कार्यक्रमात काही विधाने केली. ती विधाने मोदी यांच्या विरोधात असल्याचा अर्थ काढण्यात आला. स्वत: गडकरींनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे सांगून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण गडकरींच्या नावाची चर्चा काही थांबण्याचे नाव नाही. गडकरींना मोदींच्या स्पर्धेत आणून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याची विरोधकांची रणनिती आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीसुद्धा गडकरींचे कौतुक केले होते. ही नौटंकी असल्याचे स्वामींनी म्हटले आहे. हेही वाचा - राम मंदिरसाठी न्यायालयाच्या निर्णयाची गरज नाही - सुब्रमण्यम स्वामी
यावेळी त्यांनी रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. सोनिया गांधी आणि पी. चिदंबरम लवकरच जेलमधे जाणार असून, चिदंबरम यांचा तुरुंगात जाण्याचा पहीला नंबर असेल, असेही ते म्हणाले.