पेरणी ते कापणी मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना देण्यासाठीच्या प्रस्तावाचा विचार - सदाभाऊ खोत
नांदेड - शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय आतापर्यंत घेतले असून या माध्यमातून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आता पेरणी ते कापणीचा मजुरीचा खर्च शेतकऱ्यांना देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार असल्याचे राज्याचे कृषी आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. संस्कृती संवर्धन मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कृषि तंत्रज्ञान महोत्सव २०१९ या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या शेतकरी व महिला मेळाव्याचे आयोजन शारदानगर सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वसुंधरा सभागृह मैदानावर केले होते. दुष्काळात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेती शिवारात जावून काम पाहणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेव असल्याचे नमूद करुन राज्यमंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, शेतकरी व नागरिकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयाची राज्यात चांगली अंमलबजावणी होत आहे.
तूर, हरभरा खरेदी व बोंडअळीचे पैसे जमा केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीत नवीन तंत्र आवश्यक असून कृषि विज्ञान केंद्र हे शेतीचा दवाखाणा आहे. बदलत्या वातावरणात पिकाच्या निवडीसाठी विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून केंद्राचे काम महत्वाचे आहे. त्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. मागील 60 वर्षापासून ही संस्था शिक्षणासह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका व बियाणांचे वाटप करण्यात आले.