शेतकरी सुखी राहिला तरच देश समृध्द होईल - श्री श्री रविशंकर
जालना - देशाची आर्थिक उलाढाल आणि चढउतार हा पूर्णपणे शेती उत्पादनावर अवलंबून आहे. शेतकरी सुखी राहिला तरच देश समृद्ध होईल, असे असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दिनांक ७) जालना जिल्ह्यातील वाटूर येथील सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते.
प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांच्या पुढाकाराने साकारलेल्या श्री. श्री .ज्ञान मंदिराच्या लोकार्पण सोहळा निमित्त आणि नैसर्गिक शेती प्रदर्शनाच्या निमित्ताने श्री .श्री. रविशंकर हे जालना जिल्यातील वाटूर येथे आले होते.पुढे बोलताना ते म्हणाले, की आपल्याला सुखी राहायचे असेल तर आपले अन्नदाते सुखी राहिले पाहिजे. त्यासाठी अन्नदाता सुखी भवः चा मंत्र जपला पाहिजे. शेतीचे उत्पन्न काढतो तो शेतकरी पहिला, ते धान्य आपल्या घरापर्यंत पोहोचवितो तो व्यापारी दुसरा आणि याचे अन्न तयार करून आपल्या ताटात जी गृहीणी वाढते ती तिसरी, असे ३ अन्नदाते आहेत. त्यामुळे या तिघांसाठीही आपण जेवणापूर्वी अन्नदाता सुखी भवः म्हणून या तीन जणांसाठी ईश्वराकडे ३ वेळा प्रार्थना केली पाहिजे. हेही वाचा - पोटगीचा दावा केल्याने विवाहितेसह कुटुंबाला जातपंचायतीने केले बहिष्कृत; लग्नमंडपातून काढले बाहेर ध्यानसाधनेमुळे आपण दुःख, राग, बेचैनी, यामधून बाहेर येऊ शकतो आणि आपली संकल्पपूर्ती होते. त्यामुळे दिवसभरातून थोडा वेळ का होईना ध्यान साधना करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. जालना -परभणी रस्त्यावर असलेल्या वाटुर फाटा येथील ८ एकर मैदानावर या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. श्री. रविशंकर पुढे म्हणाले, की आपल्या संस्कृतीमध्ये अनेक चांगल्या सवयी आहेत. त्या आपण जोपासतोदेखील. मात्र, त्यांची कारणे आपल्याला माहीत नाहीत. त्यातीलच एक औक्षण करण्याची पद्धत आहे. यामध्ये सुपारी, सोने, दिवा आणि गोड पदार्थाने औक्षण केल्या जाते. यामधील सुपारी म्हणजे सन्मानाचे प्रतीक आहे. भोजनानंतर सुपारी खाल्ल्याने अन्नाचे पचन होते आणि शरीर तृप्त होते. त्यामुळे सुपारी हे समृद्धीचे आणि तृप्तीचे प्रतीक आहे. त्याचसोबत सुवर्णानेही औक्षण केले जाते. सोने हे आर्थिक सुबत्ता असल्याचे प्रतीक आहे. दिवा म्हणजे ज्ञानाचे, प्रकाशाचे प्रतीक असून या प्रकाशाप्रमाणे आपण सदैव उजळत राहो, अशी भावना औक्षण करणाऱ्याच्या मनात असते. हे सर्व झाल्यानंतर तोंड गोड करणे म्हणजे तोंडामध्ये कायमस्वरूपी गोडी राहो, संबंध असेच गोड रहावेत, असा याचा अर्थ होतो. हे आपण नेहमीच करतो. मात्र, याचा अर्थ माहीत नसल्यामुळे याची फलश्रुती होत नाही. गावागावातील गट-तट जाती धर्म विसरून एकत्र आले तरच आपली समृद्धी आणि विकास होईल. तसेच या विकासाला रसायन मुक्त शेतीची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे. रसायन मुक्त शेतीमुळे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा, असे आवाहनही श्री. श्री. रविशंकर यांनी केले.