जनावरांच्या गोठ्याला भीषण आग; परिसरात खेळणाऱ्या ३ बालकांचा होरपळून मृत्यू
जालना - जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला. आज सकाळी भोकरदन तालुक्यातील शिरसागर या गावात ही घटना घडली.
गावाला लागूनच विष्णू कोलते यांचा तुरीच्या तुराट्यांपासून बनवलेला गोठा आहे. गोठ्यावर पत्रेही टाकलेले आहेत. पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी जनावरांचा चाराही याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. हेही वाचा- लातूर - बार्शी रोडवर विचित्र अपघात; ४ जणांचा मृत्यू, २ गंभीर या ठिकाणी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सार्थक मारुती कोल्हे (६), वेदांत विष्णू मोहरे (५), आणि संजीवनी गजानन मोहरे (५) हे तीन जण खेळत होते. गोठ्याला लागलेली आग त्यांच्या लक्षातच आली नाही. त्यामुळे आगीच्या लोळांतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. आणि यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, आग विझविण्यासाठी खासगी पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाने आटोकाट प्रयत्न केले. परुंतु, आग आटोक्यात येईपर्यंत या तीनही बालकांचा मृत्यू झाला होता.