• A
  • A
  • A
डीवायएसपी सुजाता पाटील यांचा सहकुटुंब आत्महत्येचा इशारा

हिंगोली - सांगली येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेची मुलगी दत्तक घेणाऱ्या सुजाता पाटील यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्याच्या इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत बदलीसाठी विनंती करूनही अद्याप काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गृह पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी आत्महत्येचा इशारा दिल्याचे सांगितले आहे.

संग्रहित छायाचित्र


हेही वाचा - VIDEO: भर पावसात मरीन ड्राईव्हवर युगुलाचे अश्लील चाळे, सुधारगृहात रवानगी


सन २०१६ मध्ये सुजाता पाटील या मुंबई येथून पदोन्नतीवर हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात उपअधीक्षक म्हणून रूजू झाल्या. मृत अनिकेत कोथळेच्या तीन वर्षाच्या मुलीचा संपूर्ण खर्च उचलण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सुजाता पाटील यांचे पती आबासाहेब पाटील हे सेवानिवृत्त आरटीओ अधिकारी असून त्यांना ह्रदयाचा आजार आहे. पाटील यांची तीन मुले मुंबईत राहतात. सन २०१६ मध्ये रुजू झाल्यापासून कौटुंबिक अडचणींमुळे हिंगोली येथून मुंबईत बदली करावी, अशी विनंती सुजाता पाटील यांनी राज्य शासन व पोलीस महासंचालक कार्यालयाकडे केली आहे. मात्र त्यांची बदली करण्यात आली नाही.

हेही वाचा - VIDEO: सेल्फी विथ फार्मर! ...तर तुम्हाला गाल चोळत यावे लागेल -खा. राजू शेट्टी

राज्य शासनाच्या गृह विभागाने ८ जूनला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील ६० हून अधिक पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र सुजाता पाटील यांचा या यादीमध्ये समावेश नाही. दिनांक ८ जूनला सुजाता पाटील यांनी पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत टाहो फोडला आहे. 'माझ्यानंतर बदली झालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता त्यांच्या सोयीनुसार बदल्या करून घेत दोन-तीन महिन्यात परत मुंबईत आलेले आहेत', असा उल्लेख करत पाटील यांनी बदल्यांमध्ये होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ बाबींचे वाभाडे काढले आहेत.

हेही वाचा - भाजपच्या चिन्हावर लढणार आगामी निवडणूक - सदाभाऊ खोत

पुढे त्या म्हणतात, की माझी सतरा वर्षांची मुलगी मुंबईत असुरक्षित असून तिला काही झाल्यास शासन जबाबदारी घेईल का ? दत्तक घेतलेल्या मुलीचे पुनर्वसन करता येत नाही. माझ्या अर्जावर कोणताही विचार झाला नाही याचे उत्तर मिळेल का ? असेही पाटील यांनी म्हटले आहे. मुंबईत शक्य नसेल तर गडचिरोली येथे बदली करावी जेणेकरून शहीद झाल्यास कुटुंबाला लाभ मिळतील, अशी हतबलतादेखील त्यांनी पोस्टमध्ये बोलून दाखवली आहे. मी तणावाखाली असून कुटुंबासह आत्महत्येचा विचार डोक्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

होय, माझ्यावर अन्याय झालाय – सुजाता पाटील

सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट माझीच असून मीच आयजीपी व्हटकर सरांना पाठवल्याचे सुजाता पाटील यांनी भ्रमणध्वनीवर बोलताना सांगितले. बदल्या करताना माझ्यावर अन्याय झाला असून माझे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही त्या म्हणाल्या.

सुजाता पाटील यांची पोस्ट

आदरणीय सर जयहिंद. मी या वेळेस आपल्याला त्रास देत आहे. मला माफ करा. मी पदोन्नती मिळून मुंबईत येथून २०‍१६ सालापासून पोलीस उपाध्यक्षपदी जि. हिंगोली मराठवाडा येथे नेमणुकीस आहे. मी वारंवार मुंबईमध्ये बदली मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. त्याचप्रमाणे मा.मुख्यमंत्री महोदयांनी माझे अर्जही सादर केले आहेत.

आज बऱ्याच पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्या निघाल्या. यापूर्वीही तीन ते चार लॉट निघाले. परंतु माझी बदली केलेली नाही. मी सांगली पोलीस कोठडीमध्ये मृत अनिकेत कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी दत्तक घेतलेली आहे. मला तीन मुले असून माझी मुलगी सतरा वर्षांची आहे. माझी मुले मुंबईत शिक्षण घेत असून त्यांना मुंबईत सोडून मी १६ तास प्रवास करून हिंगोलीमध्ये नोकरी करत आहे. माझ्यानंतर बदली झालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता त्यांच्या सोयीनुसार बदल्या दोन-तीन महिन्यांमध्ये परत मुंबईमध्ये देण्यात आलेल्या आहेत.

मी माझ्या कुटुंबाचा मुंबईमधील खर्च व माझा हिंगोली येथील वाढीव खर्च यामुळे कर्जबाजारी झालेली आहे. माझे कुटुंब पूर्णत: उद्ध्वस्त झालेले असून मी प्रचंड तणावाखाली नोकरी करत आहे. सर माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जर माझी बदली मुंबईत होत नसेल तर माझी बदली गडचिरोली नक्षल विभागात करण्यात यावी. जेणे करून कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास शहीदांना मिळणारे फायदे माझ्या कुटुंबियांना मिळून त्यांचे पुनर्वसन होऊ शकेल व माझी शासनाकडून होणारा छळ थांबेल. आपल्याला या वेळेस मॅसेज करून त्रास देत आहे. परंतु मी प्रचंड तणावाखाली असून शेवटचा पर्याय म्हणून मी आपल्याला हा संदेश पाठवत आहे. माझे कुटुंब पूर्णत: उद्ध्वस्त झालेले आहे आणि सर्व सुखांपासून मला प्रशासनांनी वंचित केलेले आहे.

माझ्या अर्जांवर कोणत्याही प्रकारचा विचार विनिमय झालेला नाही. याचे उत्तर मला मिळेल का? मला आत्महत्या अथवा राजीनामा या दोन गोष्टींशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. माझी सतरा वर्षांची मुलगी मुंबईत असुरक्षित आहे. तिच्या जीवितास काही झाल्यास शासन जबाबदारी घेईल का ? दत्तक घेतलेल्या मुलींचे पुनर्वसन मला करता येत नाही. त्याचे उत्तर मला मिळाल्यास बरे होईल ? पर्याय नसल्याने मला माझे संपूर्ण कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करण्याचे विचार माझ्या डोक्यात येत असून मी अतिशय मानसिक तणावाखाली आहे.
जयहिंद सर.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES