• A
  • A
  • A
जालन्याच्या तिढ्यामुळे बुलडाण्यात संभ्रम तर प्रताप जाधवांचे भवितव्यही अधांतरी. . . . .

बुलडाणा - लोकसभेचे पडघम वाजले असून बुलडाणा लोकसभेत १८ एप्रिलला निवडणूक होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेनेकडून विद्यमान खासदार प्रताप जाधव यांच्या नावांची सध्या चर्चा आहे. मात्र जालन्यातील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीचा तिढा आहे. त्यामुळे शिवसेनेकडून अर्जुन खोतकरांना जालना आणि भाजपकडून बुलडाण्यात रावसाहेब दानवेंना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. त्यामुळे विद्यमान खासदार प्रताप जाधव यांचे भवितव्य सध्या अधांतरीच आहे.

खासदार प्रताप जाधव आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे


मॉ जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुका या उमेदवार घाटावरचा की घाटा खालचा आहे ? यावर अवलंबून असतो. शिवाय जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात असते. बुलडाणा लोकसभेमध्ये मराठा-माळी समाजाचे निर्णायक मतदान आहे. घाटावर मराठा समाजाचे मतदान तर घाटाखाली माळी समाजाचे मतदान जास्त आहे. लोकसभा काबीज करण्यासाठी घाटाखालील मतदानाची आवश्यकता असते. सध्या राजकीय दृष्ट्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेनेकडून विद्यमान खासदार प्रताप जाधव, वंचित बहुजन आघाडीकडून बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार यांच्या नावांची चर्चा आहे.

शिवसेनेचे खासादर प्रताप जाधव हे काँग्रेस - राष्ट्रवादी विरुद्ध भाजप -सेना अशी लोकसभेची निवडणूक लढले होते. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप जाधव यांनी राष्ट्रवादी काँगेसचे राजेंद्र शिंगणे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला ते जवळपास ५ लाख ९१ हजार ४५ मते मिळून त्यांचा १५९५७९ च्या फरकाने दुसऱ्यांदा मोठे मताधिक्य घेऊन त्यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळे यांना पराभूत केले होते.

यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णराव इंगळे हे माळी समाजाचे होते. तर मागील वेळी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे हे मराठा समाजाचे होते. पण मराठा समाजामध्ये मतांची विभागणी झाली आणि भाजप शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव हे निवडून आले. प्रताप जाधव आणि शिंगणे हे दोन्ही मराठा समाजाचे नेते असले, तरी एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत. या लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे मतदार हे मोठ्या प्रमाणावर असल्याने लोकसभेमध्ये मराठा उमेदवार हा निवडून येण्याची दाट शक्यता असते. मात्र यावर्षी खासदार प्रताप जाधव यांच्याबाबत बुलडाणा लोकसभेत नाराजीचे सूर आहेत. हे नाराजीचे सूर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यन्त पोहोचलेले आहेत. तर खासदार जाधव यांना शिवसेनेमधील गटबाजीही घातक ठरु शकते. शिवसेनेचे बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे आणि खासदार प्रताप जाधव हे कट्टर विरोधक आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार विजयराज शिंदे यांचा घाटाखाली दांडगा संपर्क आहे. बुलडाणा लोकसभा काबीज करण्यासाठी घाटाखालील लिडची आवश्यकता असते.

मराठा मूक मोर्चादरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रात आपत्ती जनक व्यंग चित्रावर चोहीकडून टीका झाली होती. त्यावेळी आपल्या खासदारकीचा राजिनामा प्रताप जाधवांनी पक्षश्रेष्ठीकडे सादर केला होता. त्यामुळे शिवसेनेवर दबाव निर्माण झाला. सामनाच्या इतिहासात दिलगिरी नामा छापल्या गेला. हा देखील खासदार जाधवांचा इतिहास आहे. तसे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रताप जाधव हे मागील १० वर्षांपासून बुलडाण्याचे खासदार आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे केल्याचे ते सांगतात. मात्र जिगाव सिंचन प्रकल्प, शेगाव विकास आराखडा, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या सिंदखेडराजा विकास आराखडा अजून अपूर्ण आहे.

अमरावती विभागातून बुलडाण्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हाही प्रश्न प्राधान्याचा आहे. जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयाची सुविधा नाही, कृषीवर आधारित कोणत्याही प्रक्रिया उद्योग नाहीत, जिल्हा सहकारी केंद्रीय बँक ही अवसानात निघाली. मोठ्या प्रमाणावर शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. हे महत्त्वाचे प्रश्न जिल्ह्यामध्ये आज आहेत.

जळगाव जामोद , संग्रामपूर , शेगाव , लोणार या तालुक्यातील दुर्गम गावातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेवरून खासदार दत्तक ग्रामयोजनेअंतर्गत मतदार संघातील एक गाव सर्वसोयीयुक्त करण्याचा संकल्प होता. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. विशेष म्हणजे खामगाव- जालना रेल्वे मार्ग हा सुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी फार महत्त्वाचा प्रश्न असून १९५२ च्या निवडणुकांपासून सातत्याने फक्त निवडणुकीच्या वेळेसच हा विषय चर्चिला जातो.

बुलडाणा जिल्ह्यात ७ विधानसभा मतदारसंघ असून लोकसभेसाठी ६ विधानसभा मतदार संघ येतात. यातील मलकापूर हा रावेरमध्ये जातो. जिल्ह्यात शिवसेनेचे सिंदखेडराजामध्ये शशिकांत खेडेकर, मेहकरमध्ये संजय रायमूलकर असे दोन आमदार आहेत. भाजपकडे मलकापूरचे चैनसुख संचेती, खामगावचे अॅड. आकाश फुंडकर, जळगाव जामोदचे संजय कुटे असे ३ आमदार आहेत. तर काँग्रेसकडे बुलडाण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि चिखलीमध्ये राहुल बोन्द्रे असे २ आमदार आहेत.

विशेष म्हणजे बुलडाणा लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी जिल्ह्यात सध्या बॅकफूटवर आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विधानसभेला तिकीटही मिळू शकले नाही. सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघ सोडला तर राष्ट्रवादी जिल्ह्यात फारशी काही नाही. तरीही राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यावर शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडवल्याचा ठपका आहे. विरोधक त्याचे भांडवल करतील. वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उमेदवार म्हणून अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी शेगांव येथील सभेत बाळापूरचे बळीराम शिरस्कार यांच्या नावांची घोषणा केली होती. बळीराम शिरस्कार यांना माळी समाज आणि वंचित बहुजन किती मदत करतील यावर प्रश्न चिन्ह आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती जर काँग्रेससोबत झालीच तर या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची मैदानात उतरण्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे. तुपकरांनी १२ मार्च पर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा १५ जागा लोकसभा लढविण्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये बुलडाण्याचा समावेश आहे.

जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरुद्ध भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असा सामना रंगला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे. खोतकर-दानवे यांच्या वादाला पूर्ण विराम देण्यासाठी खोतकरांना जालन्यातून शिवसेनेकडून आणि दानवेंना बुलडाण्यातून उमेदवारी देण्याची चर्चा आहे. जालना-बुलडाणा हे दोन्ही जागा निवडून येतात, या आशेने असा फेरबदल होऊ शकते. तसा बुलडाण्याचा इतिहास पहिला तर बुलडाण्यातून आयात उमेदवार निवडून आलेले आहेच. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे बुलडाणा जिल्ह्यातील एका पतसंस्थेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी खासदार प्रताप जाधव आणि दानवे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना दानवेंनी जाधवांना जाणूनबुजून काही टोले लगावले होते.

रावसाहेब दानवे हे भोकरदन येथील असल्याने भोकरदन आणि बुलडाणा जवळच आहे. दानवे यांचे नातेवाईक बुलडाण्यात आहेत. त्यांचा बुलडाण्यात चांगला संपर्क आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघ भाजपला द्या, अशी मागणी भाजपकडून आतून केली जाते.
बुलडाणा लोकसभा पूर्वीपासून भाजपच्या ताब्यात होता. सन १९९६ ला ही जागा सेनेला सुटली होती. यावेळी आनंद अडसूळ निवडून आले होते. तेव्हापासून बुलडाणा शिवसेनेच्या ताब्यात आहे. सोबतच यावेळी पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यामुळे परिस्थितीत देखील फेरबदल आहे. तर बुलडाण्यात भाजपची परिस्थिती पाहिली तर मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती पाचवेळा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. जळगाव जामोदचे आमदार तथा भाजप राज्य सरचटणीस संजय कुटे हे देखील तीनदा निवडून आलेले आहेत. तर खामगाव विधान सभा मतदार संघात दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पूत्र आकाश फुंडकर हे देखील आमदार आहेत. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हे देखील माजी आमदार राहिलेले आहेत. जाधवांना खासदारकी ऐवजी विधानसभा, विधानपरिषद किंवा मंत्रीपद देऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत. यामुळेच बुलडाणा लोकसभा मतदार संघात संभ्रम आहे. तर प्रताप जाधवांचे भवितव्यही अधांतरी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES